विंचूर :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सज्ज झाला आहे. जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे कामाला लागले असून 16 मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारू तसेच प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक -विक्री प्रकरणी 1,272 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तब्बल साडेतीन कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारूबंदी कायद्यान्वये एकूण 1,126 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.87,440 लिटर देशी-विदेशी,गावठी दारू साठा जप्त करण्यात आली आहे. तसेच अवैध गुटख्याची वाहतूक आणि विक्रीप्रकरणी 78 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे दोन्ही मिळून एकूण 1,272 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 3 कोटी 53 लाख 52,262 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अवैध वाहतुकीचे एकू ण 121 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनाहेल्मेट, नो पार्किंग, बेदरकार पणे वाहन चालविणे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह इत्यादी हेडखाली एकुण 8,548 जणांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्याकडून 75 लाख 74,050 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हयातील 40 पोलीस ठाणे निहाय एकुण 1,665 वॉरंट बजावण्यात आले असून जिल्हा अभिलेखावरील गुन्हयात पाहिजे असलेल्या एकूण 57 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे जिल्हयातील 40 पोलीस ठाणे, 08 उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार असे वरील प्रमाणे दररोज कारवाई करीत असुन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे.
16 मार्चपासून कारवाईला वेग देण्यात आला आहे. 32 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. आणखी 50 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे. एम.पी.डी.ए. कायद्यान्वये 04 प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. अवैध शस्त्रे बाळगणार्यांवर कारवाई करून 21 गुन्हे दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात 05 देशी बनावटीचे पिस्टल, 15 धारदार तलवारी, 08 कोयते-चॉपर, फायटर अशी अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.शस्त्र परवाना असलेले एकूण 751 अग्निशस्त्रे जमा करण्यात आलेली आहे.